रत्नागिरी:- कोकण किनारपट्टी परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण प्रजातींचे जग उलगडले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील रॉकी टाइड पूल (खडकाळ खळगे) परिसरात ३०३ समुद्री जीवांच्या प्रजाती असल्याचे संशोधनातून समोर आले. निसर्ग पर्यटनाचा भाग म्हणून कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानतर्फे टाइड-पुलिंग उपक्रम सुरू करण्याची योजना आखली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काटघर, हेदवी, खारवीवाडा, वेळास आणि वेळणेश्वर या पाच तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तांबळडेग, कुणकेश्वर आणि भोगवे या तीन ठिकाणी कोस्टल टाइड पूल टुरिझम विकसित करण्याची संधी आहे. मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने सलिम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्टरी (सॅकॉन) या संस्थेला स्मॉल ग्रँट्स प्रोग्रामअंतर्गत निधी दिला होता. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी भागात रॉकी टाईड पूलच्या परिसंस्थेतील प्राणीसृष्टीचे दस्तावेजीकरण अभ्यास प्रकल्पाचे नेतृत्व गोल्डिन क्वाड्रोस, शिरीष मांची आणि सिद्धेश भावे यांनी केली आहे. समुद्रातील खडकाळ किनारी इंटरटायडल परिसरात (भरतीवेळी हा भाग पाण्याखाली जातो आणि ओहोटीला तो वर येतो तो भाग) विस्मयकारक रचना पाहायला मिळाली. हे रॉकी टाईड पूल अनेक समुद्री जीवांसाठी लघु अधिवास आहेत. इतर किनार्यांच्या तुलनेने खडकाळ किनार्यांवर सूक्ष्मजीवांची घनता सर्वाधिक असते आणि प्राणी व वनस्पतीच्या प्रजातींची उत्तम जैवविविधता आढळते. तेथे अनेक समुद्री जीव तात्पुरता आसरा घेतात, अन्नाचा स्रोत म्हणून त्यांचा वापर करतात. काही प्रजातींसाठी ही जागा पिल्लांसाठी उत्तम पोषण निवारा असते.









