रत्नागिरी सडेवाडी येथे रस्त्यात गाडी आडवी घालून मारहाण

एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील सडेवाडी येथे १६ मे रोजी सकाळी १०.२५ च्या सुमारास एका व्यक्तीने रस्त्यात गाडी आडवी घालून प्रौढाला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लिलाधर आत्माराम खाडे (५१, व्यवसाय-शेती, रा. सडेवाडी, जयगड) हे त्यांच्या मालकीच्या मारुती सुपर कॅरी गाडी क्रमांक एमएच ०८-एपी- २२२७ मध्ये बांधकामाचे साहित्य घेऊन साक्षीदार मोहन नारायण पिल्लय यांच्यासह कामाच्या ठिकाणी जात होते. सडेवाडीतील सती मंदिरासमोरून जात असताना आरोपी विक्रम चंद्रकांत खाडे (रा. सडेवाडी, जयगड) याने त्याची गाडी रस्त्यात आडवी घालून लिलाधर खाडे यांचा रस्ता अडवला.

आरोपी विक्रम खाडे याने फिर्यादी लिलाधर यांना शिवीगाळ केली आणि ‘तू माझ्या भाच्याला शिवीगाळ का केलीस?’ असा जाब विचारला. त्यानंतर त्याने गाडीतील लोखंडी सळीने लिलाधर खाडे यांच्या कपाळावर मारून त्यांना दुखापत केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत जखमी झालेले लिलाधर खाडे यांच्या तक्रारीवरून जयगड पोलिसांनी आरोपी विक्रम चंद्रकांत खाडे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२६(२), ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जयगड पोलीस करत आहेत.