रत्नागिरी शहरात मागणीनुसार बोअरवेल; मागेल त्या सोसायटीला वेदरशेड

रत्नागिरी:- शहरातील सोसायटीधारकांना दिलासा देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मागेल त्याला बोअरवेल आणि मागेल त्याला वेदरशेड (टेरेसवर छप्पर) ही नवी योजना जाहीर केली. याचा थेट सोसायटीतील सदस्यांना फायदा होणार असला तरी ही आगामी निवडणुकीची बेगमी मानली जात आहे. शिंदे शिवसेनेने एका दगडात दोन पक्षी मारले असले तरी आगामी काळात भूगर्भातील पाणीपातळी समतोल ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी अडवून जिरवण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार
आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी पालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. तरी शहरात मोठ्या प्रमाणात पालिकेमार्फत पाणी टॅंकरने पुरवले जात आहेत. या सर्वांवर मात करण्यासाठी आणि शहरातील सर्व सोसायट्या पाणीदार करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर फंडातून शहराला २५० बोरवेल मारण्याचा निर्णय घेतला आहे. मागेल त्याला बोरवेल आणि मागेल त्याला वेदरशेड देण्यात येत आहे. उद्योगमंत्री सामंत आणि सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या पुढाकाराने आयसीआयसीआय बँक यांच्या सीएसआर फंडातून रत्नागिरी शहरातील अडिचशे बोरवेल मारल्या जात आहेत. एवढेच नाही तर मागेल त्याला वेदरशेडही दिली जात आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीमध्ये रत्नागिरी शहरातील काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सामंत यांच्यासमोर मांडला होता. काही गृहनिर्माण सोसायटीमध्ये बोरवेलची आवश्यकता असल्याची मागणी होती. त्या वेळेस त्यांनी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. सामंत यांनी सोसायटीधारकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. सोसायट्या पाणीदार करण्यासाठी मागेल त्याला बोरवेल आणि वेदरशेड देण्यात येत असून, त्याची सुरवात झाली असून आतापर्यंत दहाच्यावर बोरवेल मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सोसायट्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे. टेरेस गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी वेदरशेडही मारून देण्यात येणार आहेत.

उद्योगमंत्री सामंत यांनी शहरात विविध विकासकामे करून शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. कोट्यवधीची विकासकामे केली असली तरी थेट मतदारांना किंवा सोसायटीधारकांना न्याय देता आला नव्हता. त्यांना न्याय देण्यासाठी मागेल त्याला बोरवेल आणि वेदरशेड देण्यात येत आहे. भविष्यात भूगर्भातील पाण्याची पातळी समतोल राहावी यासाठी आम्ही पावसाचे पाणी अडवा आणि जिरवा हा कार्यक्रम हाती घेणार आहोत अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांनी दिली.