Wednesday, July 29, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी- वेतोशी येथे शेतकऱ्याला ठार मारण्याची धमकी

रत्नागिरी- वेतोशी येथे शेतकऱ्याला ठार मारण्याची धमकी

रत्नागिरी:- मोकाट गुरांनी शेतातील भातशेती व नाचणीचे नुकसान केल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून शेतकरी व साक्षीदारांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास वेतोशी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदिश कृष्णा झोरे (रा. वेतोशी धनगरवाडी, ता. जि. रत्नागिरी) याने फिर्यादी लक्ष्मण शांताराम रांबाडे (वय ४८, रा. वेतोशी वरचीवाडी) तसेच साक्षीदारांच्या शेतामध्ये मोकाट गुरे सोडली होती. या गुरांनी शेतातील भातशेती आणि नाचणी खाऊन नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शेतातील झालेल्या नुकसानीबाबत फिर्यादी व साक्षीदार आरोपीला विचारणा करण्यासाठी गेले असता, त्याने त्यांना शिवीगाळ केली.

तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी लक्ष्मण रांबाडे यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५१(२), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.