रत्नागिरी विमानतळावरून लवकरच ‘उडान’ला गती

विमानतळ विकासासाठी १० कोटी ६६ लाखांची तरतूद

रत्नागिरी:- राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी वितरित होणे बाकी असलेल्या १५० कोटी रुपयांच्या वितरणाला शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामध्ये रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी सुमारे १० कोटी ६६ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीयस्तरावरून उडान योजनेंतर्गत राज्यातील ९ विमानतळांवरुन देशांतर्गत विमान वाहतूक सेवेचा विस्तार करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच हा निर्णय झाल्याने रत्नागिरी येथून ‘उडान’ला गती मिळणार आहे.

राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी शासनाने अर्थसंकल्पात ३०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी २१० कोटी रुपयांच्या निधी वितरणाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये कोल्हापूर विमानतळसाठी २६.८२ कोटी, अमरावती विमानतळासाठी १० कोटी, आर.सी.एस. योजनेसाठी २० कोटी, कराड विमानतळासाठी ३.१८ कोटी असा एकूण ६० कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्षात वितरित करण्यात आला होता. उर्वरित १५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामध्ये रत्नागिरी विमानतळासाठी १०.६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय १५ फेब्रुवारीला जारी करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून राज्यातील ९ पैकी कोल्हापूर, जळगाव, नाशिक, नांदेड, गोंदिया आणि सिंधुदुर्ग या सहा विमानतळांवरून देशांतर्गत विमानसेवा सुरु झाल्या आहेत. रत्नागिरी, सोलापूर व अमरावती विमानतळाची कामे अंतिम टप्प्यात असून लवकरच येथूनही उडान ५.२ अंतर्गत छोट्या २० आसनी विमानांतून देशांतर्गत विमान वाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न केंद्रीय स्तरावरून सुरु आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास व्यवस्थापकीय संचालक यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीत सहकार्याने रत्नागिरी विमानतळाचे काम अंतिम टप्यात व्यावसायिक उड्डाणासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी असल्याचे स्पष्ट केले होते. उडान अंतर्गत विमान वाहतूक सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.