रत्नागिरी पोलिसांच्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत १० किलो गांजा जप्त

चिपळूणमध्ये कारवाई; तिघा आरोपींना बेड्या

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. चिपळूण येथील वालोपे सबवे जवळ १० किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला असून, खेड तालुक्यातील सुकीवली येथील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

​स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार ३ मार्च रोजी चिपळूण परिसरात गस्त घालत असताना, वालोपे रेल्वे स्टेशन फाट्यासमोर मुंबई-गोवा महामार्गावरील सबवे येथे एक रिक्षा चालक आणि मोटार सायकल स्वार संशयास्पद रितीने चर्चा करताना आढळले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी जागीच दोन पंचांसमक्ष त्यांची चौकशी आणि झडती सुरू केली.

​पोलिसांनी केलेल्या झडतीमध्ये आरोपींच्या ताब्यातून १० किलो १३८ ग्रॅम वजनाचा काळपट हिरवट रंगाचा ‘गांजा’ सदृश अमली पदार्थ सापडला. याची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे २,५३,४५० रुपये आहे. या कारवाईत अमली पदार्थासह दोन वाहने आणि इतर साहित्य असा एकूण ४,६८,४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत आकाश विजय जाधव (वय ३०), शिवकुमार भास्कर ठाकरे (वय ४८) आणि शंकर विनोद पारदे (वय ३१ सर्व रा. सुकीवली, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी गांजाची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने तो बाळगून असताना रंगेहात पकडले गेले. त्यांच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६०/२०२६ एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, शांताराम झोरे, दीपराज पाटील आणि प्रवीण होवाळ यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली.