Sunday, October 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींना मिळाले नवीन प्रशासक

रत्नागिरी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींना मिळाले नवीन प्रशासक

रत्नागिरी:- तालुक्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई आराखड्यांच्या अंमलबजावणीत निष्काळजीपणा व दिरंगाई करणाऱ्या प्रशासकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मुदत संपलेल्या ९५ पैकी ५१ ग्रामपंचायतींवर पूर्वी नियुक्त केलेल्या प्रशासकांची मुदत संपुष्टात आल्यानंतर आणि त्यांनी टंचाई आराखडे न केल्याचे उघड झाल्यानंतर, पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार जुन्या ५१ प्रशासकांची उचलबांगडी करून नवीन प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालण्यासाठी गणपतीपुळेत अंकुर सुरेश कांबळे (विस्तार अधिकारी- कृषी), मालगुंड, भगवतीनगर, नाणीज येथे पी. एन. सुर्वे (विस्तार अधिकारी-पंचायत), नाचणे व पावसला एन. एम. परहाते (विस्तार अधिकारी- पंचायत), पालीत एस. एच. गीते (पर्यवेक्षिका), हातखंबा व मिरजोळे येथे प्राजक्ता नागवेकर (विस्तार अधिकारी- पंचायत), चांदेराईला सुधाकर मुरकुटे (विस्तार अधिकारी शिक्षण), खेडशी ग्रामपंचायतला के. जी. खेडसकर (पर्यवेक्षिका) या नवीन प्रशासकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरी तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नुकतीच टंचाई निवारण आराखड्याची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. या बैठकीत तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींच्या कारभाराचा आढावा घेण्यात आला. मात्र, बोटावर मोजण्याइतक्याच प्रशासकांनी आराखडे तयार केले, तर बहुतांश प्रशासकांनी आराखडे तयारच केले नसल्याची बाब उघड झाली. तालुक्यातील गंभीर टंचाईच्या काळात अधिकाऱ्यांच्या अशा निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत, अशा कुचकामी प्रशासकांना तात्काळ बदलून नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलमांनुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी ५१ ग्रामपंचायतींवर नवीन प्रशासकांची नियुक्ती करण्याचे सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. नवनियुक्त प्रशासकांनी नियमांना अधीन राहून ग्रामपंचायतींचे कामकाज पाहावे, तसेच टंचाई निवारण, पाणीपुरवठा योजना आणि इतर प्रशासकीय कामांना प्राधान्य देऊन दिलेल्या सर्व आदेशांची तातडीने अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत.