रत्नागिरी:- मोबाईलमध्ये एक अॅप डाऊनलोड करून स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड तयार करणे एका सेवानिवृत्ताला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी युक्तीचा वापर करत त्यांच्या इंडसइंड बँकेच्या खात्यावरून तब्बल ८ लाख ६२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील इंडसइंड बँक शाखेच्या हद्दीत घडला. याप्रकरणी १७ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुहास दिगंबर सोहनी (वय ६१, रा. बी/१९, सोहम अपार्टमेंट, गोकुळ डेअरीजवळ, टिळक आळी, रत्नागिरी) हे सेवानिवृत्त आहेत. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक क्रिप्टो अॅप डाऊनलोड केले होते. या अॅपच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा देण्यासाठी एक कार्ड तयार केले आणि त्यानंतर तो अॅप अनइन्स्टॉल केला.
मात्र, त्यानंतर अज्ञात सायबर भामट्यांनी फिर्यादी यांच्या खात्यात फेरफार केली. फिर्यादी यांच्या इंडसइंड बँकेतील मुदत ठेवीच्या खात्यावरून एकूण ८ लाख ६२ हजार ४०० रुपये त्यांच्याच बचत खात्यात वळवले आणि ती संपूर्ण रक्कम ऑनलाइन पद्धतीने लांबवून त्यांची आर्थिक फसवणूक केली.
फिर्यादी सुहास सोहनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र.नं. २८१/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) आणि ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









