Sunday, May 3, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का; २.८ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का; २.८ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात गुरुवारी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. अनेक इमारतींमधील व्यक्तींना भूकंपाचे हादरे जाणवले. अनेकजण भीतीने घराबाहेर पडले. भूकंप जाणवला का याविषयी इतरांना विचारणा करीत होते. इमारतींमध्ये बसलेल्या व्यक्तींना भूकंपाच्या धक्क्याची जास्त जाणीव झाली. भूकंपाचे केंद्रबिंदू रत्नागिरी शहरापासून सुमारे २२ कि. मी. दूर असलेल्या हरचेरी येथे भूगर्भात १० कि. मी. खोल असल्याचे सांगण्यात आले.

गुरुवारचा दिवस सरत असतानाच, रात्री सुमारे ८ वाजून २० मिनिटांनी अचानक जमिनीच्या पोटातून एक गूढ आवाज आला आणि पाठोपाठ जमिनीला हादरा बसला. रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेपासून ते थेट तालुक्यात ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत हा धक्का स्पष्टपणे जाणवला. अनेक ठिकाणी घरातील भांडी पडल्याच्या आणि खिडक्यांच्या काचा थरथरल्याच्या घटना समोर आल्या.

हा धक्का जाणवताच रत्नागिरीकरांचे फोन एकमेकांना खणखणू लागले. तुम्हाला धक्का जाणवला का? काही नुकसान झाले का? अशा चौकशीसाठी नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये मोठ्या प्रमाणावर संवाद सुरू झाला. सोशल मीडियावरही भूकंपाच्या चर्चांना उधाण आले. शासकीय कार्यालयांचेही फोन खणाणले. दरम्यान, कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त समोर आले नव्हते. परंतु या धक्क्याने कोकणपट्ट्यात भीतीचे सावट पसरले आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

२.८ रिश्टर स्केलची नोंद

जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. जरी ही तीव्रता मध्यम स्वरूपाची असली, तरी स्थानिक भौगोलिक परिस्थितीमुळे नागरिकांना हा धक्का तीव्रतेने जाणवला. प्रशासनाने व्यत्काळ सतर्कतेचा इशारा दिला असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. धक्का बसताच नागरिक भयभीत झाले. विशेषतः बहुमजली इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना भूकंप जाणवला. अवघ्या काही सेकंदांच्या या धक्क्याने अनेकांच्या मनात धडकी भरली.