खेड मेटे येथील घटना; दीड वर्षांच्या मुलासह एक जण गंभीर
रत्नागिरी:- मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची हृदयद्रावक घटना खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, दीड वर्षांच्या चिमुरड्यासह एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. शुभ्रा अतिश दिवेकर असे मृत महिलेचे नाव असून, सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांच्या दीड वर्षांच्या मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर घडली. हे तिघेही मडगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाडीतून प्रवास करत होते. खेड तालुक्यातील मेटे गावाच्या हद्दीत रेल्वे असताना त्यांनी अचानक धावत्या गाडीतून उडी मारली. मुसळधार पावसात घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिघांनाही तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुभ्रा दिवेकर यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन जुवळे आणि दीड वर्षांच्या बालकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या आत्मघाती निर्णयामागे नेमके काय कारण असावे, याचा तपास आता खेड पोलीस करत आहेत. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य काही कारणातून हे कृत्य घडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शुभ्रा दिवेकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत असून, पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.









