Wednesday, May 20, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरी आठवडा बाजार येथे व्यावसायिक वादातून दुकानदाराला लोखंडी सळीने मारहाण

रत्नागिरी आठवडा बाजार येथे व्यावसायिक वादातून दुकानदाराला लोखंडी सळीने मारहाण

दोन आरोपींवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील प्रसिद्ध आठवडा बाजार परिसरात व्यवसायिक वादातून एका कपडा व्यापाऱ्यावर लोखंडी सळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘आमचे ग्राहक का तोडता?’ असे विचारल्याचा राग मनात धरून शेजारील दोन दुकानदारांनी मिळून हा हल्ला केला. या हल्ल्यात अनिल विसंबर यादव (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. कोकणनगर, रत्नागिरी) हे व्यापारी गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी अनिल यादव यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पप्पू आणि सुरेश (पूर्ण नाव माहीत नाही, दोघे रा. साळवी स्टॉप, चिराय हॉस्पिटलजवळ, रत्नागिरी) या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी आठवडा बाजार येथे ही घटना घडली. फिर्यादी अनिल यादव हे आठवडा बाजारात कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. रात्रीच्या वेळी अनिल यादव आणि त्यांचे सहकाऱ्यांसह आपले दुकान बंद करत होते. दरम्यान, त्यांच्या दुकानाच्या समोरच आरोपी पप्पू आणि सुरेश यांचेही कपड्यांचे दुकान आहे. अनिल यादव यांनी आरोपींना “तुम्ही आमचे कपडे घेणारे ग्राहक का तोडता?” असा सहज प्रश्न विचारला.

या साध्या विचारणेचा आरोपींना प्रचंड राग आला. रागाच्या भरात दोन्ही आरोपींनी त्यांच्या दुकानातील लोखंडी सळ्या हातात घेतल्या आणि अनिल यादव यांच्या डोक्यात जोराने मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांना अश्लील शिवीगाळ करत ‘ठार मारून टाकू’ अशी धमकी दिली. हा वाद सोडवण्यासाठी जेव्हा साक्षीदार मध्ये आले, तेव्हा आरोपी पप्पू याने त्यांनाही लाथांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ केली.

या घटनेनंतर जखमी अनिल यादव यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांनी १७ मे रोजी सायंकाळी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी आरोपी पप्पू आणि सुरेश यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.