रत्नागिरी:- राज्यातील एसटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे.त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे रखडलेले वेतन मिळावे यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे माळनाका येथील विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करण्यात आले.
कोविड संकटाच्या काळात देखील एसटी कामगार जीवाची बाजी लावून करत आहेत. मात्र, गेल्या जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे प्रलंवित वेतन व सप्टेंबरचे देय वेतनासह तीन महिन्यांपासून या कामगारांना वेतन रखडले होते. बुधवारी जुलै महिन्याचे वेतन अदा करण्यात आले असले तरीही दोन महिन्यांचे वेतन थकितच आहे. त्यामुळे वेतनाअभावी सर्व कामगारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे 9 ऑक्टोबर रोजी राज्यभर विभागीय कार्यालयांसमोर आत्मक्लेश उपोषण करण्यात आले.
रत्नागिरीतील माळनाका येथील विभागीय कार्यालयासमोर संघटनेचे रत्नागिरी अध्यक्ष अध्यक्ष राजेश मयेकर, सचिव संदेश सावंत, तसेच सर्व सदस्य यांनी आत्मक्लेश उपोषण केले.









