Monday, June 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणीला मारहाण; तरुणाविरुद्ध गुन्हा

मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणीला मारहाण; तरुणाविरुद्ध गुन्हा

चिपळूण:- मोबाईल नंबर अनब्लॉक करण्यास आणि बोलण्यास नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने एका ४० वर्षीय इसमाने तरुणीला रस्त्यात अडवून दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना चिपळूण येथे घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, चिपळूण पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिपळूण बाजारपेठेत राहणारी ३० वर्षीय तरुणी नोकरीनिमित्त बाहेर गेली होती. ११ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या दुचाकीवरून गोवळकोट रोड येथील कमानी तिठ्याजवळील इम्रान चायनीज सेंटरच्या मागील रस्त्यावरून जात होती. यादरम्यान गोवळकोट येथे राहणारा आरोपी राहिल पटेल (वय ४०) याने त्या तरुणीची गाडी अडवली आणि ‘मला तुझ्याजवळ बोलायचे आहे, मोबाईल नंबर अनब्लॉक कर’ असे म्हटले. त्यावर तरुणीने मला तुझ्याशी काहीही बोलायचे नाही आणि तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. तिच्या या नकारामुळे संशयित आरोपी राहिल पटेल याचा राग अनावर झाला.

त्याने भररस्त्यात तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरूनच न थांबता त्याने त्यांना जोरदार धक्काबुक्की केली आणि हाताच्या ठोशांनी त्यांच्या उजव्या डोळ्यावर, चेहऱ्यावर आणि डाव्या कानाच्या पाठीमागे जबर मारहाण केली. हा हल्ला एवढा गंभीर होता की,आरोपीने रस्त्यावरील दगड उचलून तिच्या डोक्याच्या मागील डाव्या बाजूला मारला, यामुळे ती रक्तबंबाळ झाली.

या धक्कादायक प्रसंगानंतर जखमी तरुणीने चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी संशयित आरोपी राहिल पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.