मेटे येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग, कुटुंबाला धमक्या

खेड:- तालुक्यातील मौजे मेटे येथे ११ मे रोजी दुपारी एका घरात घुसून कुटुंबाला मारहाण करण्यात आली. तसेच घरातील महिलेचा विनयभंग करत तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी शमशुद्दीन सत्तार बोट ( ४५) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शोएब अख्तर शमशुद्दीन घारे, इरफान शोएब अख्तर घारे आणि कामिल शोएब या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अख्तर घारे, इरफान शोएब अख्तर घारे आणि कामिल हे तिघे शमशुद्दीन बोट यांच्या घरासमोर आले आणि त्यांना, त्यांच्या मुलींना व आईला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊ लागले. त्यावेळी फिर्यादी यांची मुलगी या भांडणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होती. हे पाहून आरोपी इरफान घारे घरात घुसला आणि त्याने फिर्यादीच्या मुलीला मोबाईल बंद करण्याची धमकी दिली, अन्यथा तिला ‘खल्लास’ करण्याची धमकी दिली.

या झटापटीत आरोपी अख्तर घारे याने फिर्यादीच्या आईला जमिनीवर ढकलून दिले. तसेच, फिर्यादीच्या मुलीच्या अंगावरील कपडे फाटले आणि आरोपी अख्तर घारे याने तिला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीत तिच्या डाव्या डोळ्याला आणि डोक्याला दुखापत झाली. आरोपींनी तिला शिवीगाळ करत तिची ‘जिंदगी खराब’ करण्याची धमकी दिली.

आरोपी इरफान याने पुन्हा घरात घुसून फिर्यादीच्या मुलीला मोबाईल बंद करण्याची धमकी दिली आणि तिच्याशी झटापट केली. दरम्यान, आरोपी क्रमांक १ आणि ३ यांनी लाकडी दांडके घेऊन धावत येत फिर्यादी शमशुद्दीन बोट यांना खाली पाडले आणि दांडक्याने त्यांच्या पायावर, पाठीवर आणि डोक्यावर मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली.

या घटनेत १८ मे रोजी सायंकाळी जखमी शमशुद्दीन बोट यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३३३ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. घरात घुसून मारहाण आणि विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.