मुसळधार पावसात पोलीस भरती प्रक्रिया सुरु

पहिल्याच दिवशी ३०० पैकी १६२ उमेदवारांचा भरती प्रक्रियेत सहभाग

रत्नागिरी:- रत्नागिरीत मुसळधार पावसात जिल्हा पोलीस दलाची भरती प्रक्रिया बुधवारी पहाटेपासून सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी बोलविण्यात आलेल्या ३०० उमेदवारांपैकी १६२ उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. आलेल्या प्रत्येक उमेदवाराचे फेस स्कॅन करुन त्याला मैदानावर प्रवेश देण्यात आला. पुढील दोन दिवस प्रतीदिन ३०० तर त्यानंतर प्रतिदिन ५०० उमेदवार दि. १५ जुलैपर्यंत बोलविण्यात येणार आहेत.

जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी बुधवार पासून पोलिस भरती प्रक्रियासुरु झाली आहे. १४९ पदांसाठी ८ हजार ७१३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे. बुधवारी पहाटे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेला सुरुवात झाली.

भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक होणार आहे. कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडु नका. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. डमी उमेदवार देऊन यंत्रणेची फसवणुक टाळण्यासाठी प्रथमच बायोमेट्रिक फेस (चेहरा) स्कॅन यंत्रणा वापरण्यात आली आहे. बुधवारी सकाळी काहि प्रमाणात पाऊस असल्याने सकाळच्या सत्रात उमेदवारांसह नातेवाईकांची तारांबळ उडाली. दुपारी पावसाने उसंत घेतल्याने भरती प्रक्रिया सुरळी सुरु झाली. दि.१५ जुलैपर्यंत अशाच पद्धतीने भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.