Sunday, July 5, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मुरुगवाडा येथे कौटुंबिक वादातून लोखंडी शिगेने मारहाण

मुरुगवाडा येथे कौटुंबिक वादातून लोखंडी शिगेने मारहाण

एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा परिसरात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीवर लोखंडी शिगेने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दीराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मुरुगवाडा येथील नवीन भैरीमंदिर परिसरातील राहत्या घरी ही घटना घडली. रात्री झालेल्या बोलाचालीचा राग मनात धरून सुनिल दत्ताराम भोगले याने फिर्यादी प्रणिता परेश भोगले व त्यांचे पती परेश दत्ताराम भोगले यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर परेश भोगले हे खोलीबाहेर येताच आरोपीने हातातील लोखंडी शिगेने त्यांच्या डोक्यावर तसेच हातापायांवर वार करून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे.

आरडाओरड ऐकून घरातील नातेवाईकांनी धाव घेत जखमी परेश भोगले यांची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी प्रणिता परेश भोगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात सुनिल दत्ताराम भोगले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.