मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून 8 रुग्णांना मदतीचा हात 

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून तीन आठवड्यात गंभीर आजार असलेल्या चार रुग्णांना चार लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. उर्वरित चार रुग्णांचे प्रस्ताव पाठवण्यात आले असून, लवकरच त्यांनाही मंजुरी मिळणार आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातील ‌‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा‌’ कडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबंधित रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात.  जिल्हास्तरावरच या अर्जांचा निपटारा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातत दि. 2 मे रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना करण्यात आली.  

स्थापनेनंतर मागील तीन आठवड्यात ई-मेलद्वारे 15, मोबाईलद्वारे 15, ऑनलाईन फॉर्म 7, कक्षात प्रत्यक्ष 23 जणांनी संपर्क साधला. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह महात्मा फुले ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, धर्मादायिन रुग्णालय योजना आदींची माहिती देण्यात आली.

कक्षामार्फत आठ रुग्णांना मंजुरीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले होते. त्यातील चार रुग्णांना प्रत्येकी एक लाख रुपया याप्रमाणे चार लाखांचे वितरण करण्यात आले. उर्वरित चार रुग्णांना मदत मंजूर करण्यात आली आहे. कक्षामध्ये डॉ. जिज्ञा लघाटे, समाजसेवा अधीक्षक अनिता पवार, लिपिक अमित कोरगावकर हे कार्यरत असून, ते रुग्णांना मदत करत आहेत.