मिरजोळे येथील तरुणीची हत्या करून आंबा घाटात फेकले, दहा दिवसानंतर खुनाचा उलगडा

रत्नागिरी:- प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीच्या शोधादरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित खंडाळा येथील रहिवासी आहे, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिरजोळे गावात राहणाऱ्या भक्ती जितेंद्र मयेकर या २२ वर्षीय तरुणीचे खंडाळा येथील दुर्वास पाटील या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते, पण त्यांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याने वाद सुरू झाले.

प्राथमिक माहितीनुसार, याच वादातून संशयित प्रियकराने तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्यांनी आंबा घाटाकडे प्रवास केला. याच निर्जन ठिकाणी तरुणाने तिचा खून केला आणि तिचा मृतदेह तिथेच फेकून दिल्याची शक्यता आहे.

ही तरुणी १० दिवसांपूर्वी घरातून अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, त्यांना तरुणी आणि तिचा खंडाळा येथील प्रियकर यांच्यातील संबंधांची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने संशयित तरुणाला चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण कठोर चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.

माहितीनुसार, स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पथकाने तात्काळ आंबा घाटाकडे धाव घेतली आहे. तेथे मृतदेहाचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेमसंबंधातील या दुखद अंतामुळे मिरजोळे आणि खंडाळा परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण आहे.