मिरजोळे-बौद्धवाडीत दोन गटात तुफान हाणामारी; एकजण गंभीर जखमी

रत्नागिरी:- पूर्व वैमनस्यातून दोन गटात धुमश्चक्री उडून लाठ्याकाठ्यांचा वापर करीत एकमेकांना फिल्मीस्टाईल मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही गटातील पुरूष व महिला भिडल्यानंतर गावात वातावरण तंग झाले. या मारहाणीत एका गटातील तरूणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचाराकरिता कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. ही मारहाण बुधवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास मिरजोळे-बौद्धवाडी येथे घडली.

मिरजोळे-बौद्धवाडी येथील जाधव परिवारात तुफान हाणामारी झाली. या मारहाणीचे कारण क्षुल्लक होते. रिक्षा उभी करण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. यापूर्वीदेखील त्यांचे वाद झाले होते आणि त्याचे पर्यावसान बुधवारी तुफान हाणामारीत झाले. दोन्ही गटाने एकमेकांना आव्हान देऊन लाठ्याकाठ्या हातात घेऊन चाल केली. यामध्ये महिलादेखील कमी नव्हत्या. तुंबळ हाणामारी होऊन काहीजण या हाणामारीत जखमीदेखील झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिनी मोहन जाधव (वय 55, रा. मिरजोळे-बौद्धवाडी) यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. यातील संशयित राजेश काशिनाथ जाधव, यश राजेश जाधव, रसिका राजेश जाधव, विजय काशिनाथ जाधव हे तक्रारदार मोहिनी जाधव यांच्या घराजवळ येऊन ‘तू घरातून बाहेर पड, तुला बघतो’ असे म्हणत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच त्यांना मारहाणदेखील केली. मोहिनी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, चेन या मारहाणीत ओढल्याने दागिने तुटून गहाळ झाले. तसेच मोहिनी यांचा मुलगा नरेश याच्या हाताला चावा घेऊन काठीने मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी मोहिनी मोहन जाधव यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी राजेश काशिनाथ जाधव, यश राजेश जाधव, रसिका राजेश जाधव, विजय काशिनाथ जाधव यांच्याविरोधात भादंविक 354, 325, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास एपीआय जाधव करीत आहेत.

या मारहाण प्रकरणात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. दुसर्‍या गटानेदेखील तक्रार दिली आहे. रसिका राजेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास यातील संशयित नरेश मोहन जाधव याने फिर्यादीचे पती राजेश यांना ‘तू मला मैदानात भेट, तुला दाखवतोच’ असे म्हटले. याबाबतची विचारणा केली असता नरेश जाधव यांनी मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी तक्रारदार यांचा मुलगा यश पती राजेश व दीर विजय हे धावत मदतीसाठी पुढे आले. यावेळी त्यांनी नरेश याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. नरेश याने हातातील लाकडी दांडका यश याच्या डोक्यात मारला. तसेच विजय जाधव यांच्यासह राजेश जाधव यांनादेखील मारहाण केली.

या मारहाण प्रकरणी रसिका राजेश जाधव यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी नरेश मोहन जाधव, मोहन दामू जाधव आणि रूपेश मोहन जाधव, मोहिनी मोहन जाधव (सर्व रा. मिरजोळे) यांच्याविरोधात भादंविक 354, 324, 323, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास एपीआय जाधव करीत आहेत.