Friday, August 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मिरजोळे पाडावेवाडी येथे पैशांच्या व्यवहारातून मंडप डेकोरेटरला मारहाण

मिरजोळे पाडावेवाडी येथे पैशांच्या व्यवहारातून मंडप डेकोरेटरला मारहाण

पत्नीवरही दांडक्याने हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून मंडप डेकोरेटरला मारहाण करून त्याच्या पत्नीवरही दांडक्याने हल्ला केल्याची घटना रत्नागिरी शहरानजीक मिरजोळे येथील पाडावेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार एलिगन्सी, पाडावे वाडी, मिरजोळे येथील इमारतीच्या पार्किंगखाली २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी विजय भिकाजी शिर्के (वय ४९, व्यवसाय मंडप डेकोरेटर, रा. पाडावे वाडी, मिरजोळे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, राजा गाडेकर याने विजय शिर्के यांना पवार एलिगन्सीच्या पार्किंगखाली बोलावून घेतले. तेथे काळी दाढी असलेला, चॉकलेरी रंगाचा शर्ट व काळी ट्रॅक पॅन्ट परिधान केलेल्या एका इसमाने रोहन गाडेकर याच्याकडून घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून शिर्के यांच्या डाव्या पायावर गुडघ्याखाली तसेच उजव्या पायाच्या पोटरीखाली मारहाण केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, पतीला सोडविण्यासाठी विजय शिर्के यांच्या पत्नी तेथे आल्या असता त्यांनाही डोक्यात दांडक्याने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित दोन व्यक्तींनी शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी पहाटे २.१० वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपींपैकी दोघांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू आहे.