रत्नागिरी:-आंबा घाटात खोल दरीत मिळालेल्या मृतदेहाचा उलगडा झाला असून २५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाला फिरायला नेऊन मित्रांनीच त्याचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. या खून प्रकरणात रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हातकणंगले येथून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील प्रमुख संशयित आरोपी हा रावण गँगचा म्होरक्या असल्याचे आता तपासात पुढे आले आहे.
आंबा घाटात खोल दरीत ५ मे रोजी सायंकाळी ५.३० वा. अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याची खबर पोलिसांना मिळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी या मृतदेहाच्या मानेभोवती दोरी गुंडाळलेली आढळून आली. तसेच त्याचे हातही दोरीने बांधण्यात आले होते. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आता अधिकच वाढले होते.
ज्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडला होता त्यावरून हा घातपातच असल्याचा दाट संशय पोलिसांन वर्तवला होता. त्यानुसार तपासाची चक्रं वेगाने फिरवण्यात आली. नजिकच्या जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती मागवण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील महादेव उर्फ दादासाहेब निगडे हा १६ एप्रिल रोजी देवदर्शनासाठी घरातून बाहेर पडला होता. आपल्या मित्रांसोबत देवदर्शनाला जात असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र तो पुन्हा घरी परतला नाही.
महादेव हा १६ एप्रिलसाठी देवदर्शनासाठी गेला होता. मात्र तो परत घरी न आल्याने त्याच्या आईने शहापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. तर त्याची पत्नी रेश्मा निगडे हीदेखील बेपत्ता असल्याची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली होती. मात्र नंतर ती सासरी परतली
मिळालेल्या माहितीनुसार यातील मयत महादेव निगडे याचा आंबा घाटातच निघृणपणे खून करण्यात आला आणि त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याला आंबा घाटात खोल दरीत फेकण्यात आले. महादेव याचा गेम आंबा घाटातच वाजवला असल्याची माहितीदेखील आता पुढे येऊ लागली आहे.
याप्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे, असा दाट संशय पोलिसांना होता. त्यानुसार रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपासाची चक्रे वेगात फिरवली होती. गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हातकणंगले येथील तारदाळ गावात पोहोचले आणि सारा प्रकार उघडकीस आला.
यातील प्रमुख संशयित असलेला सुरज चिकोडे हा रावण गँगचा म्होरक्या असून त्याची गावात मोठी दहशत आहे. आपल्या मित्रांच्या साथीने त्याने महादेव याचा खून केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी सुरज याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर अन्य दोन संशयितांनादेखील पोलिसांनी जेरबंद केले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तारदाळ गावात पोहोचताच आंबा घाटात सापडलेल्या मृतदेहाचे फोटो त्यांनी गावकर्यांना दाखवले आणि त्यावरुन या मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह महादेव उर्फ दादासाहेब निगडे याचाच असल्याची खात्री पटली.
येथील गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मित्रांनी निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महादेव ऊर्फ दादासाहेब किसन निगडे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. आंबा घाटात हा खून झाल्याची घटना देवरुख पोलिसांच्या निदर्शनास आली. या प्रकरणी सूरज मेहबूब चिकोडे (वय २५) गणेश राजेंद्र शिवारे (३०) प्रतीक बापूसाहेब कोळी (सर्व रा. तारदाळ) या तिघा संशयितांना रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने तारदाळातून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी मयत महादेव निगडे याच्या मोबाईल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डवरुन आरोपीचा माग काढला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि देवरुख पोलिसांनी गतीमानतेने खुनाचा उलगडा केला आहे.
खुनातील मुख्य संशयित सूरज चिकोडे याची पानपट्टी असून त्याने अवैध धंद्यात बस्तान बसवले आहे. सूरज हा दोन वर्षांपूर्वी रावण गँगचा म्होरक्या होता. गावात सूरजची रावण गँगच्या नावाखाली दहशत आहे.
दरम्यान, याप्रकरणात देवरुख पोलीस स्थानकात भा.दं.वि.क. ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव याचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून लवकरच त्याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
या खूनप्रकरणातील संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पैशाच्या व्यवहारातूनच हा खून झाला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.









