Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी मारुती मंदिर येथे सुमित्रा ज्वेलर्स दुकान फोडून चांदी लंपास

मारुती मंदिर येथे सुमित्रा ज्वेलर्स दुकान फोडून चांदी लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील ‘सुमित्रा ज्वेलर्स’ हे दुकान अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दुकानाचे बंद शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि पुराव्यासाठी महत्त्वाचा असलेला डीव्हीआर चोरून नेला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुमित्रा ज्वेलर्सचे मालक किशोर महादेव देवरूखकर (वय ६३, रा. राजेंद्रनगर) यांनी शनिवार, २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद केले होते. रविवारची सुट्टी असल्याने दुकान बंदच होते. सोमवारी सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास जेव्हा ते दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी कोणत्या तरी कठीण हत्याराच्या साहाय्याने शटर उचकटून आत प्रवेश केला होता.

चोरट्यांनी दुकानातील चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. यामध्ये प्रामुख्याने चांदीचे पैंजण सुमारे १ लाख रुपये किमतीचे (१०५० ग्रॅम), चांदीचे ताम्हण ५० हजार रुपये किमतीचे (३१० ग्रॅम), चांदीचे छल्ले २० हजार रुपये किमतीचे (२०० ग्रॅम) या सामानाची चोरी झाली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ५ हजार रुपये किमतीचा हिकव्हीजन कंपनीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी पळवून नेला आहे.

पुराव्यासाठी डीव्हीआर पळवला

चोरटे अत्यंत सराईत असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. आपली ओळख पटू नये आणि चोरीचा कोणताही पुरावा मागे राहू नये, या हेतूने चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज रेकॉर्ड होणारा डीव्हीआर सोबत नेला आहे.

​याप्रकरणी किशोर देवरूखकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना याबद्दल माहिती दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे हे करीत आहेत. मारुती मंदिर सारख्या वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.