मानवी हाडांमुळे उलघडले हत्येचे गुपित; चिपळूण पोलिसांकडून खुनाचा छडा, दोघांना अटक

चिपळूण:- सदनिकेच्या भाड्यापोटी दिलेली अनामत रक्कम व अन्य आर्थिक व्यवहारातून खूनाचा प्रकार तालुक्यातील रामपूर येथे सापडलेल्या मानवी हाडाद्वारे उघडकीस आला आहे. मुंबईतील मालाड येथे हा खुनाचा प्रकार घडला असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह येथे आणण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यात मुंबईतील एका महिलेचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

एजाज कुरेशी (५४, रा. मालाड मुंबई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या खून प्रकरणी विशाल विजय खोडदेकर (२८, रा. रामपूर चिपळूण), व जन्नतुनीसा जिन्नत खान ( रा. मालाड, मुंबई ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल खोडदेकर हा मुळचा रामपूरचा असला तरी त्याची प्रियसी जन्नतुनीसा खान हिच्या मदतीने हा खून केल्याचे उघड झाले आहे. या खूनाची कबूली देखील विशाल खोडदेकर यांनी प्राथमिक चौकशीत दिली. याविषयी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी माहिती देताना सांगितले की, रामपूर येथील डॉ. रावराणे यांच्या बागेलगत विशाल खोडदेकर याची जागा आहे. या जागेत मानवी हाडे जळालेल्या अवस्थेत अनंत उदेग व दोन कामगारांना निदर्शनास आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार खात्री करून घेतली असता काहीतरी जाळल्याचे संशयास्पद आढळून आले. त्याप्रमाणे पाहणी केला असता हाडांची तुकडे, अंगठी, रिंग व रॉड सह इतर वस्तू आढळून आल्या. ही हाडे कामथे रूग्णालयात दाखवल्यानंतर ती मानवी हाडे असल्याचा संशय बळावला. तसेच त्या ठिकाणी स्टील रॉड आढळल्याने आर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन तो ऑपरेशन मध्ये वापरला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधीत जागा मालकाची माहिती घेतली असता विशाल विजय खोडदेकर याच्या मालकीची असल्याचे उघड झाले. त्यानुसार त्याची चौकशी केली असता तो चार महिन्यांपासून पसार असल्याचे पुढे आले. तसेच त्याचे दोन्ही मोबाईल सिम बंद असल्याचे स्पष्ट झाले. परंतू तो फेसबूकवर सक्रीय असल्याची माहिती मिळाली. त्याच्या फेसबूक अकॉऊंटची माहिती घेत खोडदेकर याचा माग काढण्यात आला. त्याप्रमाणे मालाड येथे असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर विशाल खोडदेकर याने त्याची प्रियसी जन्नतुनीसा खान हिचे नाव समोर आले. त्यानंतर तिलाही ताब्यात घेत अटक केली.

जन्नतुनीसा खान हिने सदनिका भाड्यापोटी एजाज कुरेशी याला सुमारे ४ लाख रूपये अनामत रक्कम स्वरूपात दिली होती. संबंधीत रक्कम कुरेशी परत करत नव्हता. त्यामुळे त्याला मालाड येथे घरी बोलावून मारहाण केली. यातच एजाज कुरेशी याचा मृत्यू झाला. १५ नोहेंबर २०२५  दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर एका बॅगेत त्याचा मृतदेह भरून मुंबई येथून कारने रामपूर येथे आणण्यात आला. त्यानंतर तो मृतदेह खोडदेकर याच्या जागेत पुरण्यात आला. दोन महिन्यांनी खोडदेकर पुन्हा घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याला हिस्त्र प्राण्यांनी बॅग बाहेर ओढून मृतदेहाचे लचके तोडल्याचे निदर्शनास आले. अखेर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यावर डिझेल ओतून मृतदेहाला आग लागून पेटवण्यात आला.

स्टील रॉडमुळे खुनास दुजोरा
एजाज कुरेशी हा मालाड येथून बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली होती. त्याच्या चौकशीसाठी चार महिन्यापुर्वी मुंबई पोलिस चिपळूणात आले होते. त्याचाच धागा पकडून पोलिस निरीक्षक मेंगडे मालाड पोलिसांशी संपर्क साधला. फिर्यादीत केलेल्या वर्णनाची माहिती घेतली असता ते एका पायाने लंगडत असल्याचे समोर आले. त्यानंतर एजाज कुरेशी याच्या पत्नीशी संपर्क साधला. त्यावेळी तिने एजाज कुरेशी हे परदेशी असताना अपघात झाल्याचे व त्याच्या पायात स्टील रॉड असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हा मृतदेह एजाज कुरेशी याचाच असल्याची खात्री पटली.

मुलाला कल्पनाच नाही
मालाड येथून मृतदेह कारने घेऊन येताना विशाल खोडदेकर, जन्नतुनीसा खान यांच्या सोबत खान हिचा १७ वर्षाचा मुलगा देखील सोबत होता. कारच्या मागिल डिकीत हा मृतदेह ठेवण्यात आला होता. मात्र याची कल्पना खान हिच्या मुलास माहिती नसल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या दोघांना न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची कोठडी मिळाली आहे.