रत्नागिरी:- पाकिस्तानला १९७१ च्या युद्धामध्ये धुळ चारलेले ते दिवस आठवले की आजही अंगावर शहारे येतात. भारत मातेसाठी जिवाची बाजी लावून आम्ही पाकिस्तानच्या छाताडावर बसण्याचा निर्धार केला होता. कराचीपासून काही अंतरापर्यंत असलेल्या शक्करगडमध्ये होतो. दिवसभर रेकी करून रात्री तोफांचा मारा करायचो. या दरम्यान प्रतिकार होण्याच्या वेळेत म्हणजे काही मिनिटाच्या अवधीतून आम्ही पाकिस्तानी सैनिकांच्या दिशेने कूच करीत होतो. आम्हाला रोखण्यासाठी पाण्यात वीज सोडली होती, अशा आठवणी माजी सैनिक रामचंद्र देमाजी सावंत यानी जागविल्या.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव शिगेला पोचला असताना कोळीसरे (ता. रत्नागिरी) येथील सावंत यांनी सांगितले की, पाक सैन्याच्या अघोरी प्रकारांवर मात करत आपल्या सैन्यांने युद्ध जिंकले. हे सांगताना त्यांचा चेहरा अभिमानाने फुलला होता. रामचंद्र सावंत म्हणाले, ”मी तेव्हा आर्मीतील महार रेजिमेंटमध्ये होतो. भारत-पाकमध्ये युद्ध सुरू होते. सुरुवातीला पाकिस्तानने हवाई दलाच्या माध्यमातून भारताच्या ११ स्टेशनवर हल्ले केले. त्यानंतर खऱ्या अर्थाने युद्धाला सुरुवात झाली. ३ डिसेंबर १९७१ मोठी ठिणगी पडली. युद्ध १३ दिवस सुरू होते. पाकिस्तानातील कराची काही कि.मी. अंतरावर असताना आम्ही भारतीय सैनिक मोठ्या त्वेशात पाकिस्तानी सैन्यांवर मात करीत पुढे-पुढे सरकत होते. दिवसभर परिसराची रेकी वरिष्ठ पातळीवर होत होती. त्याच्याकडून येणाऱ्या आदेशावरून आम्ही जीवाची पर्वा न करता निधड्या छातीने तोफा, बंदुकांच्या गोळ्यांचा सामना करीत होतो.
९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना बंदी
पाकिस्तानी धुर्तपणे आम्हाला रोखण्यासाठी अनेक शक्कला लढवत होते. त्यांनी अखेर पाण्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला. आम्ही त्यावर मात करीत लाकडी बोटी घेऊन आगेकूच केली. युद्धामध्ये अखेर भारत-पाक सैनिकांचा पूर्व आणि पश्चिम दोन्ही फ्रंटवर सामना झाला. जोपर्यंत पाकिस्तान समर्पण करेपर्यंत हे घमासान सुरू होते. अखेर १६ डिसेंबर १९७१ ला हे युद्ध समाप्त झाले. तेव्हा ९० ते ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना बंदी बनविण्यात आले. आम्ही देश सेवेच्या कामी आलो, हेच आमचे भाग्य.
समाज सेवेबरोबर देहदानही…
देशासाठी कधीही बलिदान देण्यास आम्ही तयार आहोत. निवृत्तीनंतर मी समाज सेवा करतो. अनेकांना शक्य तशी मदत करीत आलो आहे आणि करत राहणार आहे. भारत मातेने आम्हाला जे दिले, त्याने आम्ही धन्य झालो आहे. माझे जीवन सार्थ झाले. आता मी देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सावंत सांगतात.









