मांडवी नाका येथे उनाड गायीचा महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मांडवी नाका परिसरात शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. हॉटेल शिव समोर एका उनाड गायीने एका महिलेला तुडवून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सदर महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत कोसळल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

परिसरातील एका सतर्क महिलेने तत्काळ मदतीस धाव घेत जखमी महिलेला रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.या घटनेनंतर मांडवी नाका परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत उनाड गुरांच्या हल्ल्याची ही चौथी ते पाचवी घटना असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे विशेषतः महिला वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गायींमुळे वाहनचालकही भयभीत झाले असून, या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अचानक रस्त्यावर येणाऱ्या गुरांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.दरम्यान, शहरात वाढलेल्या मारकुट्या व उनाड गायींच्या समस्येबाबत शिंदे सेनेच्या एका गटप्रमुखाने माजी नगराध्यक्षांच्या कानावर ही बाब घातली होती. मात्र संबंधित पदाधिकारी सध्या निवडणुकीच्या कामात गुंतल्याने या गंभीर प्रश्नाकडे त्याने गांभीर्याने पाहिले नाही, अशी तीव्र नाराजी त्या गटप्रमुखाने पुढारीशी बोलताना व्यक्त केली. नागरिकांच्या जीवांशी खेळ होत असताना राजकीय नेत्यांसह, प्रशासन अशा समस्यांकडे कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.