महिला भाजी विक्रेतीचा लांजात हृदयविकाराने मृत्यू

लांजा:- सांगली जिल्ह्यातून लांजा तालुक्यात भाजी विक्रीसाठी आलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुषमा पोपट साळुंखे (वय ५५, रा. मर्दवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुषमा साळुंखे या चालक प्रथमेश पाटील याच्यासोबत सांगलीतील आष्टा येथून बोलेरो पिकअप (क्र. MH 10 CQ 4896) मधून भाजी विक्रीसाठी कोकणात आल्या होत्या. ११ जानेवारी रोजी रात्री त्यांनी साखरपा येथे मुक्काम केला. त्यानंतर १२ जानेवारी रोजी सकाळी ८:०० वाजता लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथील बाजारपेठेत त्यांनी भाजी विक्रीचे दुकान लावले.
दुपारी २:४५ वाजताच्या सुमारास भाजी विक्री करत असतानाच सुषमा यांना अचानक चक्कर आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपचारासाठी वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ०५/२०२६ अशी करण्यात आली आहे. ही घटना १२ जानेवारी रोजी घडली असली तरी, याप्रकरणाची अधिकृत नोंद १६ जानेवारी रोजी सायंकाळी १७:०९ वाजता करण्यात आली आहे. सांगलीहून पोटापाण्यासाठी आलेल्या महिलेचा अशा प्रकारे कामाच्या ठिकाणीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.