हातखंबा महामार्गावर दुचाकीस्वारांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हे दाखल
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील कारवांचीवाडी फाट्याजवळून हातखंबा ते रत्नागिरीदरम्यानच्या महामार्गावर विरुद्ध दिशेने आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवून अन्य वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धीरज धर्मराज सावंत (वय ३४, रा. बौद्धवाडी, खेडशी, जि. रत्नागिरी) व मोहम्मद अली सलाम काझी (वय ४६, रा. घाटीवळे, मुस्लिमवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) अशी संशयित स्वारांची नावे आहेत. या दोन्ही घटना रविवारी (ता. २५) दुपारी दिडच्या सुमारास कारवांचीवाडी फाटा ते रत्नागिरी महामार्गावर घडल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित स्वार धीरज सावंत व मोहम्मद काझी हे दोघे त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र. एमएच ०८ बीआर ४८३५) दुचाकी (क्र. एमएच ०८ बीई ०१३६) घेऊन रत्नागिरी ते हातखंबा या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर विरुद्ध बाजूने दुचाकी निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरील अन्य वाहनांना अडथळा निर्माण होईल आणि अपघाताचा धोका निर्माण होईल, अशा प्रकारे वाहन चालविल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील या ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार धीरज सावंत व मोहम्मद काझी याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









