खेड:- कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. कळंबणीनजीकही धावत्या रेल्वेगाडीतून महिलेचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावत पलायन केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
कोकण मार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रज्ञा प्रकाश कोटवाडेकर या एस-५ डब्यातील ५१ क्र.च्या आसनावरून प्रवास करत होत्या. त्या खिडकीजवळ बसलेल्या असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातून दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावत पोबारा केला. या घटनेनंतर रेल्वेची आपत्कालीन स्थितीतील साखळी खेचण्यात आल्याचे समजते. या बाबतची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार सुरू आहेत. दिवाणखवटीपाठोपाठ आंजणी रेल्वेस्थानकात अशा घटना घडल्या आहेत. पुन्हा कळंबणी स्थानकानजीक घटना घडल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या मार्गावर दागिने हिसकावणारी टोळीच कार्यरत असण्याची शक्यता यापूर्वी वर्तवण्यात आली होती. मात्र ही बाब रेल्वे पोलिसांनी अजूनही गांभिर्याने घेतली नसल्याने चोरट्यांचे फावत आहे.









