रत्नागिरी:- जिल्ह्यातील स्थानिक मच्छीमारांकडून अवैध मासेमारीबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाने “ऑपरेशन निशाचर” ही विशेष गुप्त मोहीम आखली. प्रतिकूल हवामान, समुद्रातील जोरदार वारे, उंच भरतीच्या लाटा आणि नियमित गस्ती नौका कार्यान्वित नसण्यासारखी आव्हाने असतानाही विभागाच्या पथकाने मध्यरात्री धाडसी कारवाई करत दापोली तालुक्यातील अंजर्ले किनारपट्टीसमोर रायगड जिल्ह्यातील ‘एकवीरा दर्शन’ या एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकेला पकडले.
रत्नागिरी विभागाची नियमित गस्ती नौका काही दिवसांपासून कार्यान्वित नसल्यामुळे अवैध मासेमारीविरोधातील कारवाईसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक मच्छीमारांच्या तक्रारींची दखल घेत विभागाने पर्यायी गस्ती नौका मुंबई येथून उपलब्ध करून थेट दापोली किनारपट्टी परिसरात कारवाई करण्याची रणनीती आखली.
समुद्रातील जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे परिस्थिती आव्हानात्मक असतानाही पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने मध्यरात्री मोहीम राबविली. या विशेष मोहिमेदरम्यान अंजर्ले किनारपट्टीसमोर एलईडी दिव्यांच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्या ‘एकवीरा दर्शन’ नौकेवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान रायगड जिल्ह्यातील आणखी दोन एलईडी मासेमारी नौका परिसरात उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. समुद्रातील जोरदार वारे आणि प्रतिकूल परिस्थितीचा फायदा घेत या दोन्ही नौका पथकाच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी झाल्या. तथापि, गस्ती पथकाने तत्परतेने केलेल्या कारवाईत या नौकांवरील अवैध एलईडी दिव्यांचे नुकसान करण्यात यश मिळविले.
या कारवाईमुळे अवैध एलईडी मासेमारीविरोधात विभागाने प्रतिकूल समुद्री परिस्थितीतही दाखविलेली सज्जता आणि तत्परता अधोरेखित झाली आहे. या कारवाईत परवाना अधिकारी, रत्नागिरी श्री. चिन्मय जोशी, परवाना अधिकारी, गुहागर श्री. स्वप्नील चव्हाण, परवाना अधिकारी, साखरी नाटे श्री. पार्थ तावडे, सागरी सुरक्षा पर्यवेक्षक श्री. पुरुषोत्तम घवाळी आणि सागरी सुरक्षा रक्षक श्री. सचिन सुद यांनी सहभाग घेतला.
मा. आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य श्री. भानुदास पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरीक्त आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. महेश देवरे, सहआयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. नागनाथ भादुले आणि सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी श्री. जीवन सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय विभागात उपलब्ध मनुष्यबळ अत्यंत मर्यादित असून, अनेक परवाना अधिकाऱ्यांकडे त्यांच्या नियमित कार्यक्षेत्राव्यतिरिक्त अतिरिक्त कार्यक्षेत्रांचा कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. प्रशासकीय कामकाजाची अतिरिक्त जबाबदारी आणि मर्यादित मनुष्यबळ अशा दुहेरी आव्हानांना सामोरे जात असतानाही परवाना अधिकारी प्रत्यक्ष सागरी गस्त व धडक कारवाई मोहिमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत.
एलईडी दिव्यांच्या साहाय्याने होणाऱ्या अवैध मासेमारीमुळे पारंपरिक व कायदेशीर मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन सागरी पर्यावरणाचे संरक्षण, मत्स्यसंपदेचे संवर्धन आणि कायदेशीर मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग कटिबद्ध आहे.









