रत्नागिरी:- शहरातील मजगाव रोड येथील नाखरेकर चाळ परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील रोख रकमेसह विविध वस्तू असा एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विजय जगन्नाथ नाखरेकर (वय ६३, व्यवसाय शेती, रा. नाखरेकर चाळ, मजगाव रोड, रत्नागिरी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून २१ सप्टेंबर ला सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. या दरम्यान तक्रारदार यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील विविध वस्तू तसेच रोख रक्कम तक्रारदार यांच्या संमतीशिवाय चोरून नेली. चोरट्याने घरातील स्टीलची टाकी, स्टीलचा हंडा, दोन स्टीलच्या कळशा, स्टीलची ताटे, वाट्या, तांब्या, जर्मनचे टोप, स्टीलची तवे व पराती, तसेच जर्मनचे कुकर अशा घरगुती वस्तू चोरल्या. याशिवाय स्टीलची शेगडी, कॉम्पॅक्ट कंपनीचा टेबल फॅन, प्लास्टिकच्या दोन खुर्च्या आणि एक प्लास्टिकचे टेबलही लंपास केले.
घरातील कपड्यांवरही चोरट्याने हात साफ केला. वापरलेल्या पाच साड्या, सात शर्ट, पाच पँट आणि चार टी-शर्ट चोरीला गेले आहेत. तसेच सुमारे २५ किलो तांदूळ असलेली प्लास्टिकची पिंप, दोन रग, तीन चादरी, एक शर्ट आणि एक ब्लँकेट अशा जुन्या वापरातील वस्तूही चोरीस गेल्या आहेत. याशिवाय तक्रारदारांचे नाव लिहिलेली जुनी लाकडी पाट, स्टीलचे तीन रिकामे डबे, जर्मनचे दोन मोठे पिठाचे डबे आणि मसाल्याचा एक डबा चोरट्याने चोरून नेला.
या सर्व वस्तूंसह घरातील ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा असलेली सहा हजार रुपयांची रोख रक्कमही चोरीस गेली आहे. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत ४९ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादी विजय नाखरेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सोमवारी (ता. १२) ऑक्टोबरला रात्री सात वाजता शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घरफोडी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.









