रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी- करजुवे येथे मच्छीविक्रेत्या महिलेच्या खूनातील आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. उत्तम भिकाजी गमरे (७५, रा. पिरंदवणे बौद्धवाडी ता. संगमेश्वर) असे खुनातील आरोपीचे नाव आहे. मच्छीविक्रेत्या महिलेच्या खूनप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी उत्तम गमरेसह अन्य एकावर खूनाचा गुन्हा दाखल करत अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरंदवणे येथील सईदा रिझवान सय्यद (५०) यांचा डिंगणी – करजुवे येथील तारवा शेत पायवाटेवर मृतदेह आढळला होता. सईदा यांच्या डोक्यावर मध्यभागी व डाव्या बाजूला एकूण ९ जखमा आढळल्या होत्या. सईदा यांचे शवविच्छेदन करण्यात आले असता त्यांचा खून झाल्याचे समोर आले. त्यानुसार संगमेश्वर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी जयेश रमेश गमरे व उत्तम भिकाजी गमरे यांना खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली. पोलीस तपासात पैशासाठी जयेश व उत्तम यांनीच हा खून केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
उत्तम गमरे यांनी आपल्याला जामीन मिळावा, यासाठी सत्र न्यायालयापुढे जामीन अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयापुढे या अर्जावर सुनावणी झाली. गमरे यांच्या वकिलांकडून न्यायालयापुढे सांगण्यात आले की, आरोपीचे वय लक्षात घेता तो खून करण्याची शक्यता नाही.
पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या रिमांड अहवालात उत्तमविरूद्ध पुरेसा पुरावा दिसून येत नाही. तसेच त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून तो कोठेही फरार होणार नाही. आरोपी निर्दोष असून न्यायालयाच्या अटी व शर्थींचे तो पालन करेल. यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तर सरकारी पक्षाकडून अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी न्यायालयापुढे सांगितले की, आरोपीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला आहे. तो जामिनावर सुटल्यास फिर्यादी व साक्षीदार यांना धमकावेल. तसेच तपासात अडथळा निर्माण करण्याची शक्यता असून तो फरारही होवू शकतो. अद्याप तपास काम पूर्ण झाले नसून आरोपीला जामीन मंजूर करू नये, अशी विनंती न्यायालयापुढे केली.