उत्तर प्रदेशातील इसम ताब्यात
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील पालवणी ब्राह्मणवाडी येथील आंबा-पोफळीच्या बागेत संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाकडून पोलिसांनी दोन जुन्या सोलर प्लेट जप्त केल्या आहेत. या मालाबाबत कोणतीही समाधानकारक माहिती देता न आल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार कारवाई केली आहे.
रमाकांत द्वारिका राजभर (वय ४५, मूळ रा. डडवराजा, डडवा भैय्या, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. पालवणी, ब्राह्मणवाडी, ता. मंडणगड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांच्या सुमारास मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विशाल विठोबा कोळथरकर हे पालवणी येथील ब्राह्मणवाडीतील आंबा-पोफळीच्या बागेत गस्तीवर असताना आरोपी रमाकांत राजभर संशयास्पद स्थितीत आढळला. त्याच्या ताब्यामध्ये २ हजार ६०० रुपये किमतीच्या दोन जुन्या सोलर प्लेट, वायर व कनेक्टर मिळून आल्या.
सदर माल कुठे व कोणाकडून आणला याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता, आरोपीला कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. यामुळे १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी मंडणगड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









