भाट्येतील ‘त्या’ व्हिडीओनंतर पोलिस सतर्क, अश्लील चाळे करणाऱ्यांना चाप बसणार?

रत्नागिरी:- शहरानजिकच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागात अश्लील चाळे करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिस दल सतर्क झाले असून, रत्नागिरी शहर पोलिसांनी विविध भागांत २४ तास पहारा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आडोशाला अश्लील चाळे करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

शहरानजिकच्या भाट्ये समुद्रकिनारी अश्लील चाळे करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच रत्नागिरीच्या संस्कृतीला काळिमा फासल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेत तत्काळ उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे .भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील युगुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता त्या भागात पोलिसांनी विशेष नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.

रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी भाट्ये टेबल पॉइंट, भगवती किल्ला आणि शहरातील अन्य विविध ठिकाणी गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी दुपारी त्यांनी भाट्ये येथील टेबल पॉइंट येथे टीमसह जाऊन पाहणी केली. त्याचबरोबर अन्य भागांतही पाहणी केली. अश्लील चाळे करताना जर कोणी सापडले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल असे विवेक पाटील, पोलिस निरीक्षक यांनी सांगितले.