रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ भाट्ये समुद्र किनार्यावर पर्यटकांना काटेरी केंड हा विषारी असलेला अत्यंत दुर्मिळ मासा मृतावस्थेत आढळून आला आहे.
काटेरी केंड हा मासा अतिशय विषारी प्रकारातील मासा आहे. शत्रू जवळ येताच तो त्याचा आकार फुटबॉल सारखा फुगवतो. हा पश्चिम किनारपट्टीला आढळतो त्याच्या सात प्रकारच्या जाती आहेत. काटेवाला प्रकारातील माशाच्या अंगावर काटे जास्त असतात. ज्यावेळी हा मासा सर्वसाधारण माशाच्या आकाराचा असतो त्यावेळी त्याच्या अंगावर काटे दिसत नाहीत. पण ज्यावेळी एखादा शत्रू प्राणी किंवा मनुष्य त्याच्या जवळ येतो तेव्हा त्याच्या पोटात असलेल्या हवेच्या पिशवीच्या माध्यमातून हवा पोटात घेतो आणी आपला आकार हा जणू फुटबॉल सारखा करतो. त्यावेळेस काटे टोकदार होतात. हे त्याचे वैशिष्ट्य मानले जाते. जपानसारख्या देशात हे केंड मासे खाल्ले जातात. पण त्यावेळी या माशावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया केली जाते. अवयव काढून कातडीमध्ये असलेले विषारी असलेला टॉक्सिन हा पदार्थ काढून घेतला जातो. त्यानंतरच यापासून पदार्थ तयार केले जातात. प्राचीन काळी हा मासा सुकवला जात असे. तो सुकला की त्याच्या आतील घटक काढून त्याचा डोक्यावरील शिरस्त्राण म्हणून वापर केला जात असे, असे मत्स्य संशोधकांकडून सांगण्यात आले. या प्रकारचा विषारी असला तरी दुर्मिळ मासा भाट्ये समुद्र किनारी पाहायला मिळाला.