भांबेड येथील घरात ८० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त

लांजा:- लांजा पोलीस ठाण्याच्या पथकाने भांबेड गावात मोठी कारवाई करत एका घरातून विक्रीसाठी ठेवलेली ८० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली असून, पोलिसांनी ४७ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा पोलीस ठाण्याचे पोकॉ. नितेश चंद्रकांत आर्डे (वय ३२) यांना मौजे भांबेड, माजरा आंबावाडी, ता. लांजा येथील एका घरात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकासह रात्री ८.२५ वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या घरावर छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी लवेश रघुनाथ पवार (वय ४७, रा. भांबेड, माजरा आंबावाडी, ता. लांजा) याच्या घराच्या पडवीत गैरकायदा आणि बिगरपरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने साठवलेली गावठी दारू मिळून आली. पोलिसांनी तपासणी केली असता, एकूण चार सफेद मळकट रंगाच्या २० लिटर मापाच्या प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ही दारू साठवलेली होती. प्रत्येक कॅनमध्ये २० लिटर याप्रमाणे एकूण ८० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या दारू व कॅनची अंदाजित किंमत ८,२०० रुपये इतकी आहे.
फिर्यादी पोकों. नितेश आडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, लांजा पोलीस ठाण्यात रात्री १०.३० वाजता आरोपी लवेश पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच्यावर गु.आर.नं. १२२/२०२५ नुसार महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.