Friday, October 2, 2026
spot_img
Home दापोली भांडी घासत असताना साप चावल्याने महिलेचा मृत्यू

भांडी घासत असताना साप चावल्याने महिलेचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील उन्हवरे जाधववाडी येथील एका महिलेला भांडी घासत असताना साप चावल्याची गंभीर व दुर्दैवी घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत उपचारादरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे.

कविता किसन खापरे (वय ४९ वर्षे, रा. उन्हवरे जाधववाडी, पो. वावघर, ता. दापोली, जि. रत्नागिरी) या दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास आपल्या घराच्या मागील पडवीमध्ये पायरीजवळ भांडी घासत होत्या. त्या दरम्यान त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला साप चावला, ज्यामुळे त्यांच्या बोटातून रक्त येऊ लागले.
त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना ॲम्बुलन्सद्वारे वालावलकर हॉस्पिटल, डेरवण, ता. चिपळूण येथे हलवले. तेथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ७२/२०२६ (बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये) नोंदविण्यात आला आहे.