Sunday, September 20, 2026
spot_img
Home संगमेश्वर भरधाव कारच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी

भरधाव कारच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी

आरवलीत अपघातानंतर कारसह चालक फरार

संगमेश्वर:- कोंडिवरे ते आरवली असा दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या जमीर युसूफ डिंगणकर (रा. कोंडिवरे, ता. संगमेश्वर) यांना आरवली येथे भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. अपघातानंतर कार न थांबवता चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले. या अपघातात डिंगणकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीर डिंगणकर हे दुचाकीवरून कोंडिवरेहून आरवलीच्या दिशेने जात असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, डिंगणकर रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर कार चालकाने जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी थांबण्याऐवजी वाहन वेगाने पळवून नेले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी डिंगणकर यांना मदत केली. तसेच माखजन पोलीस दूरक्षेत्राला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. फरार कारचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरात नाकाबंदी सुरू केली.

दरम्यान, अपघात करणारी कार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने पोलिसांच्या तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून फरार वाहनाचा शोध सुरू असून चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जमीर डिंगणकर यांना उपचारासाठी प्रथम डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मिरज येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळी न थांबता पलायन केल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून फरार चालकाचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.