रत्नागिरी:- आलिशान कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांची रेकी करून भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या टोळीने रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातील एकुण १० घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी जिल्हा पोलिस या टोळीला लवकरच तपासासाठी ताब्यात घेणार आहे.
रायगड जिल्ह्यातील पाली, रोहा, महाड, श्रीवर्धन येथे घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. सर्व गुन्ह्यांमध्ये एक कारचा वापर होत असल्याचे निष्पन्न झाले होते. या टोळीचा प्रमुख शाहनवाज इकराम कुरेशीला (वय ५०) उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील सिंकदराबाद येथे छापा टाकून रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून चोरीतील १५ लाखांच्या मुद्देमालासह २४ काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्यासह शमीम इस्लाम कुरेशी, हिना कुरेशी, नौशाद कुरेशीला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. उच्चभ्रू सोसायट्यांमधील बंद घरे हेरून, त्यांचे कुलूप तोडून मौल्यवान दागिने, रोकड ते लंपास करीत होते. रायगड पोलिसांच्या पथकाने महिनाभर आरोपींच्या परिसरात वेषांतर करून माहिती संकलित केली होती.
आंतरराज्य टोळीला रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केल्यानंतर त्यांच्याकडुन रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातील एकुण १० घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरीतील २ घरफोड्यांचा समावेश आहे. तशी कबुली टोळीने दिल्यामुळे रायगड पोलिसांचा तपास झाल्यानंतर या टोळीला रत्नागिरी पोलिस तपासासाठी ताब्यात घेणार आहे.









