दापोली:- दापोली येथील बीएसएनएल कार्यालयाच्या इमारतीत चोरीची खळबळजनक घटना घडली आहे. कार्यालयाच्या ओसी लॅन रूमच्या विंडो एसीचा दरवाजा बाहेरून तोडून आत प्रवेश करत चोराने ७ हजार रुपयांची डीसी केबल लांबवली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास दापोली येथील बीएसएनएल कार्यालयात घडली. याबाबतची फिर्याद विजय राम मीना (वय ३५, रा. नम्र विलास भवन, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, आझाद मैदान, दापोली) यांनी दिली आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी विशाल परशराम सर्वे (वय ३०, रा. सडवे सुतारवाडी, ता. दापोली) याने बीएसएनएल कार्यालयाच्या ओसी लॅन रूमच्या विंडो एसीचा दरवाजा जबरदस्तीने उचकटून व तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर रुममधील सुमारे ७ हजार रुपये किंमतीची निळ्या व लाल रंगाची जुनी वापरलेली डीसी केबल फिर्यादीच्या संमतीशिवाय व लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेली.
या प्रकरणी १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून १६ मिनिटांनी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३०५(ई) तसेच भादंवि कलम ४५४ आणि ३८० नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.









