रत्नागिरी:-बंद घराचे लोखंडी ग्रील व कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातून ३५ हजार रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष द्वारकानंद देवरुखकर यांच्या बंद घराचे लोखंडी ग्रील व दरवाजाचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला व घरातून २५ हजार रुपयांची रोख रक्कम त्याचबरोबर एक एलईडी टीव्ही, सिलेंडर टाकी, कुकर, मिक्सर, चांदीचे नाणे, चांदीची गणपतीची व पोर्सेलिनची राधाकृष्णाची मूर्ती यासह घड्याळ, बेडशीट, सोलर लॅम्प आदी गृहोपयोगी साहित्य चोरुन नेले.
या प्रकरणी संतोष देवरुखकर यांनी देवरुख पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा. दं. वि. क. ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करीत आहेत.