Wednesday, September 30, 2026
spot_img
Home गुन्हेगारी फोटो काढण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले

फोटो काढण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले

लांजा वेरवली बुद्रुक येथे दिवसाढवळ्या जबरी चोरी

लांजा:- तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ६० वर्षीय महिलेला दुचाकीवर बसवून नंतर ‘फोटो काढतो’ असे सांगत तिच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून अज्ञात भामट्याने पोबारा केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे वेरवली परिसरात खळबळ उडाली असून, लांजा पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

वेरवली खुर्द डोळेवाडी येथील रहिवासी सरिता दिनकर बाणे (वय ६०) या मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास वेरवली बुद्रुक येथील दिलीप मुळे यांच्या घरी नेहमीप्रमाणे घरकामासाठी पायी जात होत्या. त्या वेरवली खुर्द शाळा क्रमांक १ च्या पुढील वळणाजवळ पोहोचल्या असता पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना आवाज देत, “आजी कुठे चालला आहात, तुम्हाला पुढे सोडतो,” असे सांगितले. अनोळखी व्यक्तीने आपल्याला लिफ्ट देण्याच्या उद्देशाने मदत केली असल्याचे समजून बाणे या त्याच्या दुचाकीवर बसल्या.

संबंधित इसमाने त्यांना मुळे यांच्या घराच्या गेटपासून सुमारे १०० मीटर अंतरावर उतरवले. त्यानंतर बाणे या पायी चालत मुळे यांच्या घराच्या गेटजवळ पोहोचून आत जात असतानाच तो इसम पुन्हा मोटारसायकलवरून त्यांच्या मागोमाग तेथे आला. त्याने “आजी थांबा, तुमचा फोटो काढतो,” असे सांगून मोबाईलचा कॅमेरा त्यांच्या चेहऱ्याजवळ नेला. महिला काही समजून घेण्याच्या आतच त्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाचे, दोन पदरी सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून तोडले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याने मोटारसायकलवरून भरधाव वेगाने घटनास्थळावरून पलायन केले.

या घटनेत सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या बाणे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील उपलब्ध माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर करीत आहेत.