रत्नागिरी:- फुड प्रोसेसिंग व्यवसाय करणाऱ्या प्रौढास त्यांच्या दुकानात घुसून मारहाण करणाऱ्या संशयित आठ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश भाटकर, एक महिला, अक्षय भाटकर, अनिकेत मयेकर आणि अन्य चार अनोळखी (पु्र्ण नाव पत्ता माहित नाही) असे संशयित आहेत. ही घटना ३० सप्टेंबरला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुड प्रेसेसिंग व्यवसाय करणाऱे फिर्यादी यांच्या मालकीच्या दुकानात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महेश मोहन गर्दे (वय ४०, रा. रवींद्र नगर, कुवारबाव, रत्नागिरी) हे आपल्या मालकीच्या दुकानात असताना दुकानात कामाला असलेली मुलगी हिच्याशी काहीतरी चाळे केले या गोष्टीचा राग मनात धरुन संशयित आठ जण महेश गर्दे यांच्या दुकानात अनधिकृत रित्या शिरले व गर्दे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच दुकानाच्या रॅकवर डोके आपटले. तर संशयित यश भाटकर याने दुकानातील स्टुल डोक्यात मारले. या मारहाणीत गर्दे यांच्या कपाळाला, छातीला, गालावर दुखापत झाली. तसेच संशयितांनी दुकानाच्या सामानाचे नुकसान केले. जखमी गर्दे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी फिर्यादी महेश गर्दे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.