रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी:- सावंतवाडी शहरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी वेळीच हाणून पाडला आहे. रेल्वे पोलिसांच्या मदतीने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास धाडसी कारवाई करत पोलिसांनी संबंधित मुलगी आणि तिच्यासोबत असलेल्या तिघा तरुणांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी साई बसवेश्वर रिंजे (वय १८) आणि रोन मोहन राठोड (वय १८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिसरा संशयित आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शिक्षणासाठी मुंबईत राहत असताना तिची एका तरुणाशी ओळख होऊन मैत्री झाली होती. मात्र, ही मैत्री मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नसल्याने पालकांनी तिला पुन्हा सावंतवाडीत आणले होते. दरम्यान, संबंधित तरुणाने आपल्या काही मित्रांसह सावंतवाडीत येऊन मुलीला पुन्हा सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले होते. मात्र, घरी परतल्यानंतर मुलीने पुन्हा त्या तरुणांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ती गुपचूप घरातून निघून मुंबईच्या दिशेने रवाना झाली. ही बाब लक्षात येताच मुलीच्या पालकांनी तातडीने सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. संबंधित संशयित रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सापळा रचला. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई यशस्वी करून सर्वांना ताब्यात घेण्यात आले व चौकशीसाठी सावंतवाडीत आणण्यात आले. या प्रकरणी दोन तरुणांविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न व अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिसरा साथीदार अल्पवयीन असल्याने त्याच्याबाबत स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.









