Thursday, September 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार २०० रोपांची लागवड

प्रत्येक ग्रामपंचायतीत होणार २०० रोपांची लागवड

प्रशासकीय यंत्रणा सज्ज; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

रत्नागिरी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील सेवेची २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, तसेच ‘सेवा परमो धर्म:’ हा विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या लोककल्याणकारी अभियानाचा शुभारंभ उद्या, गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २०० वृक्षांची लागवड आणि आरोग्य शिबिरांच्या आयोजनाने होणार आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत हे अभियान यशस्वी बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, या अभियानाचा मुख्य उद्देश सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुकर करणे आणि त्यांना शासकीय सेवांचा थेट लाभ मिळवून देणे हा आहे. त्यामुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून योजनांची व्यापक जनजागृती करावी. ‘सेवा सेतू’ उपक्रमांतर्गत सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर विशेष शिबिरे भरवून प्रलंबित दाखले, सेवा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात.

‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत नगरपरिषदा व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे, नदीघाट आणि ऐतिहासिक बारवांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवावी. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने जिल्ह्यातील तरुण, नवउद्योजक (स्टार्टअप्स) आणि ग्रामीण भागातील कल्पक संशोधकांना एकत्र आणण्यासाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’चे आयोजन करावे.
शिक्षण विभागाने शासकीय व खासगी शाळांमध्ये ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धा व भव्य प्रदर्शन भरवावे. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी महिलांसाठी आरोग्य व पोषणाची शिबिरे आणि लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घ्यावेत. केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींमध्ये कलापथक आणि पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात यावे.

विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कृतज्ञतापूर्वक ‘आशीर्वादाचा दीप’ प्रज्वलित करण्यात यावा, तसेच जनजागृतीसाठी ‘मानवी रांगोळी’चे प्रभावी आयोजन करावे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग नोंदवत, समन्वयाने काम करून रत्नागिरी जिल्ह्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री जिंदल यांनी शेवटी केले.