अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू
रत्नागिरी:- नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाट परिसरात एलपीजी गॅस टँकर पलटी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या भीषण अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मृत चालकाचे नाव महेश संतोष अनभुले (रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे आहे. अपघातानंतर आंबा महामार्ग पोलिस मदत केंद्र आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम आज रात्री 10 नंतर करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आंबा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक रात्री 10 नंतर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी कोकणाकडे जाणारी सर्व वाहतूक अणुस्कुरा घाट मार्गे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना आंबा घाट टाळून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.









