राजापूर:- तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिर व कला-वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, नाटे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहाराच्या तांदूळ चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघाही संशयितांना ताब्यात घेतले आहे. राजापूर न्यायालयात हजर केले असता त्या संशयितांना जामीन मंजूर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाबाबत नाटे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, यामध्ये आणखीन काहींचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोषण आहाराचा तांदूळ चोरीचा धक्कादायक प्रकार नाटे येथे उघडकीस आला आहे. शाळेच्या गोदामातून पोषण आहाराच्या धान्याची पोती चोरून नेताना स्थानिक ग्रामस्थांनी एक गाडी पकडून हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी मकरंद धाक्रस यांच्या लेखी तक्रारीवरून कुणाल अनिल थळेश्री, सुनील वसंत दुगीलकर, नाना बीरा करे आणि रवींद्र तानू जाधव या संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करून नाटे पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता संशयित चौघांनाही जामीन मंजूर झाल्याची माहिती पोलिसांनी
दिली. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाटे शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. नाटे पोलिसांशीही शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधला. या प्रकरणातील दोषर्षीवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचे त्यांनी यावेळी ग्रामस्थांना आश्वासित केले होते. त्यामुळे राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून वरिष्ठ कार्यालयाकडे देण्यात येणारा अहवाल आणि त्यानुसार शिक्षण विभागाकडून कोणती कारवाई होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.









