पोलिसांना मारहाण करून त्यांचीच दुचाकी घेऊन पळालेल्या आरोपीच्या मुसक्या अखेर आवळल्या

रत्नागिरी:- पकडायला आलेल्या पोलिसांना मारहाण करत त्यांचीच दुचाकी घेऊन पसार झालेल्या गुन्हेगाराला अखेर पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसपथकाला यश आले आहे. खेडशी परिसरात या संशयित आरोपीच्या मुसक्या शुक्रवारी सकाळी पोलिसांनी आवळल्या.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार जिल्ह्यातील एका गुन्ह्यात संशयित आरोपी हेमंत पांडुरंग देसाई पोलिसांना हवा होता. त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने गुन्हे केल्याच्या शक्यतेने तो पोलिसांना हवा होता.

शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ वा.च्या सुमारास हेमंत देसाई हा उद्यमनगर येथे आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी प्रविण खांबे, दत्तात्रेय कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार दोन्ही कर्मचारी त्याला पकडण्यासाठी उद्यमनगर येथे गेले होते. पोलिसांना पाहिल्यानंतर हेमंतने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. 

यावेळी हेमंतने पोलीस कर्मचारी प्रवीण खांबे यांच्या हाताच्या मनगटाला चावा घेऊन तसेच पोलिसांवर दगड मारून खांबे यांचीच मोटारसायकल घेऊन तेथून पळून गेला होता.

दोन पोलिसांना चावून हेमंत पळून गेल्यानंतर त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह शहर, ग्रामीण पोलीसांची पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. कर्मचार्‍यांना चावून पळणार्‍या हेमंत देसाई विरोधात शहर पोलीस स्थानकात भा.दं.वि.क. ३०७, ३५३, ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील सराईत गुन्हेेगार हा मूळचा देऊड गावाचा राहणारा असल्याने त्याचे मूळगावी येणे-जाणे होते. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात त्याच्यावर चोरीचे एकूण ५ गुन्हे दाखल असून मुंबई परिसरात खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी, चोरी व सरकारी कामात अडथळा यासारखे ११ गुन्हे दाखल आहेत. हेमंत देसाई हा गुन्हा करून पोलिसांच्या नजरेआड झाला होता. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक खास पथक नियुक्त करण्यात आले होते.

शुक्रवारी सकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला हेमंत पांडुरंग देसाई (वय २९, रा. कांदिवली, मुंबई) याच्याबाबत माहिती मिळाली होती. तो खेडशी परिसरात येणार असल्याची खबर मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने खेडशीसह चॉंदसूर्या, हातखंबा आदी ठिकाणी सापळा रचला होता. याचदरम्यान हेमंत हा हातखंब्याच्या दिशेने खेडशीकडे येत असताना चॉंदसूर्यादरम्यान त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, पोलीस उपनिरीक्षक विनायक नरवणे, पो.हे.कॉं. मिलिंद कदम, आशिष शेलार, पो.ना. बाळू पालकर, रमीज शेख, अमोल भोसले, सत्यजीत दरेकर, चालक दत्तात्रय कांबळे यांनी केले.