रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथील ६४ वर्षीय वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असतानाच, आरटीओ ऑफिस जवळील रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला.
पोमेडी बट्टक, बौद्धवाडी येथील रहिवासी चंद्रकांत शंकर पवार (वय ६४) हे २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. ते घरी न परतल्याने नातेवाईकांकडून त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता.
मंगळवारी, ३ मार्च रोजी दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी आरटीओ ऑफिसच्या पुढे असलेल्या कुवारबाव ब्रिजजवळ रेल्वे ट्रॅकच्या बाजूला एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांनी ओळख पटवली असता, तो मृतदेह बेपत्ता असलेल्या चंद्रकांत पवार यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. रेल्वे अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ३ मार्च रोजी दुपारी २ वाजता रत्नागिरी पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









