रत्नागिरी:- चारचाकि वाहन खरेदीसाठी एनईएफटी प्रणालीद्वारे सुमारे 36 लाख 50 हजार 280 रुपये भरुनही ऑटोमोटिव्ह कंपनीने गाडी न देता अपहार केला. याप्रकरणी कंपनी मालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 29 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3 ते 4 वा. कालावधीत घडली आहे.
अर्जुन राज असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात डॉ. मतीन अलिमियाँ परकार (40, रा.थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानूसार, 29 सप्टेंबर रोजी मतीन परकार यांनी त्यांच्या वडिलांच्या नावे स्कुडेरिया ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड मध्ये स्कोडा सुपर्ब ही गाडी घेण्यासाठी शिवाजी नगर येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून एन. ई. एफ. टी. ने 36 लाख 50 हजार 280 रुपये भरले होते. परंतू पैशांचा भरणा करुनही कंपनीने त्यांना गाडी न देता पैशांचा अपहार केला.म्हणून आपली फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. मतीन परकार यांनी कंपनीचा मालक अर्जुन राज विरोधात गुरुवार 9 डिसेंबर रोजी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.









