पैशासाठी मुलाने बापाच्या मानेवर सुरा ठेवून केले अपहरण

संगमेश्वर:- तालुक्यात मानवी नात्याला काळी छाया पडणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. ८० वर्षीय वडिलांचे पैशासाठी अपहरण करणाऱ्या नराधम मुलाला चिपळूण पोलिसांनी गजाआड केले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली. त्याने आपल्या वडिलांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपहरण केले. श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. चोरप-या, ता. संगमेश्वर) असे नराधम मुलाचे नाव आहे. त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांना पैशासाठी मानेवर सुरा ठेवून पळवून नेले आणि नंतर व्हॉटसॲपवर हात-तोंड बांधलेला फोटो पाठवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली.

या प्रकाराची देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार त्याच्या आईने सौ. सुनिता दत्तात्रय मराठे (वय ७४) यांनी दाखल केली. त्यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे.

सुनीता मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार,सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (वय ८०) यांना पेन्शन मिळते. पैशाच्या मागणीवरून वारंवार वाद घालणारा मुलगा श्रीकांत याने सोमवारी रात्री ११ वाजता घरातच थरार रंगला. आई आणि आपल्या मुलीसमोर सुराने वडिलांच्या मानेवर धाक दाखवत, “आता एक लाख रुपये द्या नाहीतर ठार मारतो” अशी धमकी दिली. वडिलांना जबरदस्ती कपडे घालून टू-व्हिलरवर बसवून सह्याद्रीनगरच्या दिशेने पळून गेला.

खंडणीचा फोटो आणि धमक्या

पहाटेपर्यंत काहीच संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत असतानाच सकाळी नात वेदांगीच्या मोबाईलवरून अपहरण झालेल्या वडिलांच्या मोबाईलवरून व्हॉटसअॅप कॉल आला. त्यात वडिलांचा हात-पाय आणि तोंड प्लॅस्टिक टेपने घट्ट बांधलेला फोटो दिसला.श्रीकांतने त्या फोटोसोबत एक लाख रुपये खंडणी मागितली आणि नकार दिल्यास “मी आता मागे हटणार नाही” अशी धमकी दिली.

आईचे धाडस, पोलिसांचा तत्पर तपास

या घटनेनंतर आई सुनिता मराठे यांनी धाडस दाखवत थेट देवरूख पोलीस ठाणे गाठले आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्पर कारवाई करत चिपळूण परिसरातून श्रीकांत मराठेला ताब्यात घेतले. सध्या देवरूख पोलीस पुढील तपास करत असून, आरोपीवर खंडणी, अपहरण आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.